राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये होणार नेत्रदीपक पुरस्कार सोहळा

आशा पारेख, एन. चंद्रा, अनुराधा पौडवाल, शिवाजी साटम, रोहिणी हट्टंगडी, सुदेश   भोसले , दिग्पाल लांजेकर यांच्यासह नामवंतांचा होणार पुरस्काराने गौरव
मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा  आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
शासनामार्फत ५८ आणि ५९ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यंदा एकाच वेळी प्रदान केले जाणार आहेत. त्याचबरोबर २०२३ मधील चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (१० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना तर  स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ( १० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना या पुरस्कार सोहोळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
यासोबतच, २०२३ चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (६ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह)  लेखक-दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल लांजेकर यांना तर  स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार (६ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह)  जेष्ठ लेखक- दिग्दर्शक-संकलक एन.चंद्रा यांना प्रदान करण्यात येणार आहे.
यासोबतच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात येणार असून प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार प्रदान सोहोळ्याला राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा, इम्रान प्रतापगढी, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, विधान परिषद सदस्य सचिन अहिर, विधानपरिषद सदस्य भाई जगताप, विधान परिषद सदस्य सुनिल शिंदे, विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय, आमदार कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, आमदार अजय चौधरी, आमदार आर. तमिल सेल्वन, आमदार आदित्य ठाकरे , आमदार यामिनी जाधव उपस्थित रहाणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अपर मुख्य सचिव , सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात येत आहे.
जनसंपर्क विभाग
सांस्कृतिक कार्य विभाग , महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक महामंडळ.

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये होणार नेत्रदीपक पुरस्कार सोहळा

Previous post Aa Raha Hai Surya Apni #Dhaaak Jamane Sep 20, 2024 Ko Apke Nazdiki Cinema Gharo Main…
Next post Maharashtra State Film Awards Ceremony To Celebrate Legends: Asha Parekh, N Chandra, Anuradha Paudwal, Shivaji Satam, Digpal Lanjekar, Rohini Hattangadi, Sudesh Bhosale And More